मुंबई : लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची हीच लोकशाही आणखी बळकट करावी यासाठी देशातील नागरिकांना मतदान प्रक्रियेत हिरीरिने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येतं. ज्यासाठी निवडणूक आयोगाकडून संबंधित मतदान आणि संपूर्ण निवडणुक प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येतात.
भारतीय निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे ध्येय गाठण्यासाठी मुंबई उपनगर आणि इतरही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी हजारो कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सध्याच्या घडीला मुंबई- उपनगर जिल्ह्यातील तब्बल ६० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना यासाठीचं रितसर प्रशिक्षण देण्यात आलं. ज्यामध्ये कायदा, सुव्यवस्था आणि निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमावलीविषयीही विस्तृत माहिती देण्यात आली.
सध्याच्या घडीला एकूण २६ मतदारसंघ, ७३९७ मतदान केंद्र आणि ७२ लाख ६३ हजार २४९ इतकी मतदार संख्या असलेला मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदार संघ असलेला जिल्हा आहे. परिणामी या जिल्ह्याकडे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व मुक्त पार पाडण्याचं मोठं आव्हान होतं. पण, कर्मचाऱ्यांना मिळणारं प्रशिक्षण आणि एकंदर प्रक्रिया पाहता हे आव्हानही पेलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस आणि निकालाचा दिवस याशिवायही असंख्य जबाबदाऱ्या विविध शासकीय संस्थांतील कर्मचाऱ्यांतर्फे पार पाडल्या जातात. ज्यामध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही यावर जातीनं लक्ष ठेवण्यासाठी विविध यंत्रणा आणि प्रत्यक्ष निवडणूक आणि निकाल या दिवशी कार्यरत असणाऱ्या मतदान अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. सोबतच पोलीस, शिक्षक, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी वर्गालाही दोन ते तीन स्तरांमध्ये प्रशिक्षण दिलं गेलं आहे. एकंदरच काय, तर निवडणुकांसाठी सारंकाही असं म्हणत निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे.