राजकीय हालचालींना वेग! दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

Updated: Oct 25, 2019, 09:19 PM IST
राजकीय हालचालींना वेग! दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. निवडून आलेल्या २ अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. विदर्भाच्या रामटेकमधून आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार निवडून आले. यानंतर या दोघांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आणि आमचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं सांगितलं.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला १५ अपक्ष आमदारांनी मला फोन केला होता, असा दावा केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर १३ ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. एमआयएमला २, बहुजन विकास आघाडीला ३, सीपीएमला १, जनसुराज्य शक्तीला १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, मनसे १, शेकापला १, प्रहारला २, रासप १, समाजवादी पक्ष २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला ५०-५० फॉर्म्युलाची आठवण करुन दिली. तसंच गरज पडली तर अमित शाह यांनी चर्चेसाठी यावं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं ठरलं तसंच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.