मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या एसटी सेवेवर मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळाले. खबरदारीचा उपाय म्हणून काही एसटी डेपोतच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आंदोलनकांनी एसटीलाच टार्गेट केले. राज्यभरात तब्बल २६ बसेसची तोडफोड केली तर मुंबईत ९० बेस्टच्या गाड्या फोडल्यात.
काल दिनांक तोडफोड केलेल्या बेस्ट बसची संख्या ८३ होती व आज तोडफोड केलेल्या बसची संख्या ९० होती. दोन दिवसांत एकूण १७३ बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेय.
कुठल्याही आंदोलनात आणि बंदमध्ये लक्ष्य केलं जातं ते बसेसना. आजच्या बंद दरम्यानही हेच घडलं. सकाळपासून मुंबईत झालेल्या तोडफोडीत ४८ बेस्ट बसेसचं मोठं नुकसान झाले आहे. आंदोलकांनी बेस्टसच्या बसेसना लक्ष्य करत बसेसच्या काचांची तोडफोड केली. तर इतर महानगरं, शहरं आणि ग्रामीण भागात आंदोलनादरम्यान २६ एसटीचे नुकसान केले.
रायगडच्या महाडमध्येही महाराष्ट्र बंदचे पडसाद दिसून आले. आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग बंद केला होता. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. त्याआधी महाडमधील आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी तीन ते चार वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दुकानं बंद असतानाही नुकसान झाल्याने व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
महाराष्ट्र बंदची मोठी झळ मुंबई उपनगरांना बसल्याचं दिसतंय. विक्रोळीच्या एलबीएस मार्गावरील बसेस आणि कार्सची मोठ्या संख्येनं तोडफोड करण्यात आली. रस्त्यावरून धावणा-या आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. काही ठिकाणी बाईक्सचीही तोडफोड करण्यात आली आहे. तर कांजूरमार्ग स्टेशनवरील साहित्याचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
महाराष्ट्र बंद च्या पाशर्वभूमीवर मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर कळंबोली , येथे रास्ता रोको केला, त्याचप्रमाणे मुबई - पुणे आणि मुंबई - गोवा महामार्गावर रास्ता रोको केला आहे. यामुळे बराचवेळ वाहतूक कोंडी झाली होती.