मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पीक विमासंदर्भातला प्रश्न काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी प्रश्नोत्तरच्या तासाला उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यातल्या ४७ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे.
आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. दहा जिल्ह्यात अनेकदा टेंडर काढूनही पीक विमा कंपन्या आल्या नाहीत, त्या जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या धर्तीवर मदत दिली जाईल, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी जाहीर होणार आहे. याआधी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.