'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार'

कोरोनाच्या संकटकाळात  शेतकऱ्यांची फसवणूक होणे, दुर्दैवी आहे. 

Updated: Jun 28, 2020, 02:15 PM IST
'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार' title=

मुंबई: गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातून बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई मिळवून देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीविषयी संताप व्यक्त केला. ग्रामीण भागातून बोगस बियाण्यांच्या तक्रारी येत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी आपल्यासाठी राबत आहे. तरीही अशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होणे, दुर्दैवी आहे. राज्य सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देईल, हे आश्वासन मी देतो. तसेच शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कठोर शिक्षा होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. 

३० जूननंतर लॉकडाऊनचं काय? उद्धव ठाकरे म्हणाले....

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोगस बियाणांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्य सरकारने अनुदान थांबविल्याने महाबीजने यंदा महागात बियाणे विकले आणि हे महाग बियाणे खरेदी करून सुद्धा ते बोगस निघाले. यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे. कोरोना संकटाच्या काळात शेतकरी आधीच त्रस्त असताना आता बोगस बियाण्यांमुळे त्याच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

दरम्यान, आजच्या फेसबुक संवादात उद्धव ठाकरे यांनी ३० जूननंतर लॉकडाऊन शिथील करण्याचे संकेत दिले. आपण टप्याटप्प्याने एक एक गोष्टी सुरु करत आहोत. मात्र, याचा अर्थ कोरोनाचा धोका संपला असे नाही. अनेक भागांमध्ये प्रशासकीय अधिकारी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यासाठी परवानगी मागत आहेत. त्यामुळे आपल्या भागात लॉकडाऊन पुन्हा लागू होऊन द्यायचा की नाही, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.