मुंबई : राज्यातला सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना फोन केले, पण त्यांनी फोन उचलले नसल्याची खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. माझ्यावर खोटारटेपणाचे आरोप झाल्यामुळे दु:खी आहे. देवेंद्रनी अमित शाह यांचा आधार घेऊन खोटेपणाचा आरोप केलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं, पण मी लाचार नसल्याचं सांगितलं. अमित शाह यांना समसमान पदवाटपाचं सांगितलं, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदही त्यांनी मान्य केलं. मग ते मातोश्रीवर आले. देवेंद्र फडणवीस यांनाही हे सांगण्यात आलं, पण त्यांनी शब्दांचा खेळ केला, अशी टीका उद्धवनी केली.
देवेंद्र मित्र होते, म्हणून पाच वर्ष पाठिंबा दिला होता. वेळ मारण्यासाठी खोटं बोलायला मी काही भाजपवाला नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. नितीश कुमारांनी वेगळी चूल मांडली, पण मी मांडली नाही. भाजपला शत्रू मानत नाही, पण त्यांनी खोटं बोलू नये, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.
सरकारमध्ये असताना शिवसेनेकडून वारंवार नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या आरोपांवरही उद्धवनी भाष्य केलं. आम्ही मोदींवर टीका केली नाही, उदयनराजेंनी पूर्वी मोदींवर टीका केली. तसंच दुष्यंत चौटाला यांनी केलेल्या टीकेची क्लिपही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवली.
शब्द फिरवणाऱ्यांची वृत्ती आमची नाही. दोन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती एकत्र आल्या होत्या त्याचे समाधान होते. गंगा साफ करताना मनं कलुषित झाली. चुकीच्या माणसांसोबत कारण नसताना गेलो याचे दु:ख आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं, याचा विचार संघाने करावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री आमचं सरकार येईल असं म्हणतात, मग मी इतर पर्यायाचा विचार आम्ही केला तर त्यात वाईट काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
नरेंद्र मोदी आणि माझं भावाभावाचं नात कुणाला खुपतंय? खोटं बोलणाऱ्यांशी मी बोलणार नाही. तुमच्या शब्दांवर आता विश्वास नाही. युती त्यांच्यावर अवलंबून आहे. मी बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पाळणार आहे आणि एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.