Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांची साथ सोडून उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासून मानले जात होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठा वाघेरे यांनी दोनवेळा तयारी देखील केली होती. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. दुसरीकडे आता मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून इच्छुक आहेत. त्यामुळे आता मावळमधून वाघेरे हे पार्थ पवार यांना आव्हान देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पाच दिवसांपूर्वीच घेतली होती भेट
संजोग वाघेरे यांनी 25 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी मावळ लोकसभेच्या तिकिटाबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी वाघोरे यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याचेही म्हटलं जात आहे.
अजित पवारांची टीका
या भेटीवर अजित पवार यांनी भाष्य केलं होतं. कुणाची भेट घ्यायची, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्याकडील लोकांना घेत आहे, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला होता.
"संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आहे. त्याच्या विचार आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखाली काम करण्याचे ठरवलं. त्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. भेटीनंतर मला वाटलं नाही की ते एकदम मितभाषी आहेत. ते सर्वांना घेऊन चालणारे आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या समवेश मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे," असे संजोग वाघेरे यांनी म्हटलं.
सत्ता जी होती, ती पुन्हा येणारच आहे - उद्धव ठाकरे
"मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात, म्हणालात, मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला आहे. काहीजण भावूक आहे, जे भावनेला महत्त्व देतात, ज्यांच्यात संवेदना आहेत, ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत. काहीजण घाऊक आहेत, त्यांना आता खोक्यामध्ये बंद करयाच आहे. तसं पाहिलं तर मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली आहे. आधी बाबर होते. त्यानंतर मी शब्द दिला होता, म्हणून जे आता गद्दार झालेत, त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे, असं काही नव्हतं की, शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली, गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे. फरक स्वच्छ आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेमध्ये आहे आता की तुम्ही येताय? सत्ता जी होती, ती पुन्हा येणारच आहे, त्याबाबत दुमत नाही. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.