महायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला

Ajit Pawar : महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीला सरकारी योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांना गायब करण्यात आलं आहे. आता भाजपाच्या बॅनरवरही अजित पवारांचा फोटो नाहीए.

राजीव कासले | Updated: Sep 10, 2024, 02:02 PM IST
महायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला title=

Ajit Pawar : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा श्रेयवाद रंगताना पाहायला मिळतोय. या योजनेसंदर्भात वांद्रे भागात भाजपने लावलेल्या बॅनर (BJP Banner) मधून अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो गायब झालाय. नुकत्याच झालेल्या अमित शाह यांच्या दौऱ्यात देखील अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचं कारण बनली होती. त्यातच भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्याने पुन्हा चर्चा रंगतेय. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून फोटो गायब झाल्यानं त्यावरून आता अजित पवारांनी मिश्कील टोलेबाजी केलीय. मीच त्यांना माझे फोटा काढण्या सांगितल्याचं अजित पवार म्हणालते.

सरकारी योजनांच्या देखाव्यातूनही अजितदादा गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर सरकारी योजनांचा (Government Schemes) देखावा तयार करण्यात आलाय. मात्र, या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब आहे. अजित पवारांच्या ऐवजी श्रीकांत शिंदेंचा फोटो झळकतोय. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेच फोटो आहेत. इतर देखाव्यातदेखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदेंचा फोटो आहेत. तर केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्ष पोस्टरवर अजित पवारांचा फोटो लावण्यात आलाय. ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रच्या नकाशात अजित पवारांचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चा रंगू लागल्यात.

शिंदेंच्या नेत्याने अजितदादांचा फोटो झाकला

दुसरीकडे बारामतीतही महायुतीत संघर्ष पाहायला मिळतोय. शिवसेनेच्यावतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं. पण या महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी चक्क अजित पवारांच्या फोटोवर काळ कापड टाकलं. यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत.

अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली. पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या तरी अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नसल्याने अजित पवारांच्या फोटो काळ कापड टाकल्याचं सुरेंद्र जेवरे यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं आहे.

अजितदादांची अमित शाहंना भेट

अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यानंतर चर्चांणा उधाण आलं होतं. त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकऱण दिलंय. अमित शाहांसोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही जागांची मागणी केली नाहीये. ज्या बातम्या येत आहेत त्यात तथ्य नसल्याचंही अजित पवार म्हणालेत..मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचंही अजित पवार म्हणालेत. 288 जागांवर एकत्र बसून निर्णय होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय..