'राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डीजे वाजवू'; सुषमा अंधारेंना मनसेचा इशारा

MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच गणेश विर्सजन मिरणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या डॉल्बी आणि डीजेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केले होते. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 6, 2023, 10:46 AM IST
'राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डीजे वाजवू'; सुषमा अंधारेंना मनसेचा इशारा title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गणपती विसर्जन मिरवणूक, डीजे यामुळे होणाऱ्या प्रदूषण आणि त्रासावरती भाष्य केलं होतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका केली होती. कोणाच्यातरी नातवाला त्रास होतो त्यावेळी काही जण दुपारी उठून बोलतात इतर वेळीही त्यांनी बोलावं अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. या टीकेला आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सुषमा अंधारे यांना पत्र लिहून उत्तर दिले आहे.

अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही, असे मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"प्रिय अंधारे बाई, हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राज ठाकरेंनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डीजे आणि लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतय. सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे आणि राज ठाकरे सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात," असे शालिनी ठाकरे म्हणाल्या.

"कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या 'गट' प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या 'गट' प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते. शिल्लक सेना प्रमुख आज काल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणून आपण नैराश्येत आहात. त्यातूनच संबंध नसताना आपण राजसाहेबांच्या नातवाला या राजकारणात ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. या बाबत आपण खरंतर जाहीर माफी मागितली पाहिजे. पण आमच्या देव देवतांचा, आमच्या संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही. त्यामुळे आम्ही आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे. आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का?," असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे.

"अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा," असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.