'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'

Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा अशी मागणी  संजय राऊत यांनी केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 22, 2024, 03:35 PM IST
'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा' title=

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने (BJP) कंबर कसलीय. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. ज्याला बॅटिंग करायची आहे,  त्याने करा, मैदानात उतरा ठोकून काढा, पण अट एकच आहे, हीट विकेट होऊ नका, तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेयत. पुण्यात रविवारी भाजपाचा कार्यकर्ता मेळवा पार पडला. या मेळाव्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahaviks Aghadi) जोरदार हल्ला बोल केला. 

'फडणवीस यांना अटक करा'
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांना अटक करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी भाषणात वापरलेल्या 'ठोकून काढा' या शब्दावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय. विधान परिषद निवडणुकीत मविआचे 20 आमदार फोडले असे फडणवीस म्हणतात, त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शाहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटलंय. कालच फडणवीसांनी मविआचा फुगा फुटला असून, विधान परिषद निवडणुकीत त्यांचे 20 आमदार कधी फुटले ते कळलं नाही असं विधान केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय.

अमित शहा यांच्यावरही निशाणा
भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेप फॅन क्लबचे नेते असं म्हटलं. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेत अशी टीका अमित शाह यांनी केली होती. यालाही संजय राऊत यानी उत्तर दिलं आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे, हे सांगायला आम्हाला लाज  वाटते, भाजप सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मामनित केलं. पंतप्रधान मोदी यांनीही शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. पण आता त्यांच्याच पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात मतभेद दिसत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला केक कापण्यात कधीच आनंद नव्हता, देशाच्या संघर्षात अनेक मुस्लिम बांधवांनी देखील बलिदान दिलं आहे, गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय.

अमित शहांची नेत्यांबरोबर गुप्त बैठक
दरम्यान, काल रात्री उशिरा अमित शाहांनी विनोद तावडे आणि फडणवीसांशी स्वतंत्र संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुण्यात पहाटेपर्यंत अमित शाहांच्या बैठकांचा धडाका सुरू होता. या बैठकीमध्ये लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, सध्याच्या राजकीय घडामोडी , विधानसभेचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी अमित शाहांकडून राज्यातील मोठ्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय...