Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालाविरोधात एकीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आरोपांची राळ उठवलीय तर दुसरीकडे पक्ष बळकटीकरणासाठी स्ट्रॅटेजी आखलीय. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे दिग्गज नेते लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट गावोगावी फिरणार आहे. या मोहीमेची सुरुवात होणार आहे. विदर्भातून (Vidarbha) रामटेकपासून ठाकरे गट प्रचाराची सुरुवात करेल. रामटेकच्या प्रचाराचं नेतृत्व एकप्रकारे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) करतील. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत. महिला कार्यकर्त्या तसंच मतदारांशी त्या संवाद साधतील.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमानेंनी शिंदे गटात जाणं पसंत केलं. संजय राठोड, भावना गवळींनीही ठाकरे गटाची साथ सोडलीय. विदर्भात ठाकरे गटाची फारशी ताकद नसतानाही नुकसान झालंय, त्यामुळेच सर्वात आधी विदर्भाकडे ठाकरेंनी कूच केलीय..
विदर्भात ठाकरे गटाची झालेली पडझड पाहता महिला मतदारांना साद घालण्याचं धोरण आखण्यात आलंय. त्यातही ठाकरे कुटुंबातील एक सदस्य प्रत्यक्ष मैदानात उतरतोय. त्यातून शिवसैनिकांचा आत्मविश्वास दुणावेल अशी स्ट्रॅटेजी आखण्यात आलीय. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरेंनी नवरात्रीत देवीदर्शन केलं होतं. रश्मी ठाकरेंचं ठाण्यात येणं ठाकरे गटासाठी बूस्ट ठरलं होतं. त्यामुळेच रश्मी ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरेंचा आरोप
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं रणशिंग फुंकलंय. आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाची वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डोममध्ये महापत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, रोहित शर्मा आमदार-वकील अनिल परबांनी राहुल नार्वेकरांसह निवडणूक आयोगाच्या निकालावर टीकेची झोड उठवली. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख पदाची निर्मिती आणि या पदावर उद्धव ठाकरेंची निवड याचा 2013चा व्हिडीओही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या जनतेच्या न्यायालयात शिवसेनेच्या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. १९९९ ची घटनाच जर ग्राह्य धरायची होती तर मग २०१४ साली नरेंद्र मोदींनी पाठिंबा का घेतला होता? त्यावेळी पाठिंबा घेण्यासाठी एखाद्या ढोकळावाल्याची सही घ्यायची होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 2018 साली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड केली होती, त्याचे व्हिडिओही उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. अनिल देसाई यांनी याची घोषणा केली होती. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खाली वाकून नमस्कार केला होता, तेही या व्हिडिओमध्ये दिसतंय.
नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी सुरक्षा सोडून जनतेत यावं आणि तिथे सांगावं शिवसेना कुणाची, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. मिंध्यांनी नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव आणावा, मी पाठिंबा देतो, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय.