CM Eknath Shinde appealed to Mumbaikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती घेतली, वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावं, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे असेही निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या होल्डींग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे सांगितलं.
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन आढावा घेतला.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त… pic.twitter.com/6ii9GnUJeR
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2024
दरम्यान, मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी समुद्रात टाकण्याची यंत्रणा करण्यात येत आहे. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं.