मराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली

Maratha Reservation Protest News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांना वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Updated: Jan 25, 2024, 09:40 AM IST
मराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली title=

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा (Manoj Jarange Mumbai Morcha) आज नवी मुंबईत पोहोचणार आहे. लाखोंच्या संख्येंने असलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह शुक्रवारी मुंबईत धडकणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत. लाखो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर मुंबई विस्कळीत होईल. यामुळे नियोजन बिघडण्याची आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंची समजूत घालण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखले नाही, तर मुंबई ठप्प होईल अशी याचिका देखील कोर्टात दाखल करण्यात आली होती. आंदोलनासाठी मुंबईत दाखल होण्याचे आवाहन जरांगे यांनी मराठा आरक्षण समर्थकांना केले आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले आणि ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. ही स्थिती टाळण्यासाठी जरांगे पाटील यांना शहरात येण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची विनंती सरकारने कोर्टात केली होती. मात्र मनोज जरांगेंनाना रोखता येणार नाही अशी असे कोर्टानं म्हटलं आहे.

अशातच आता मराठ्यांचा मोर्चा मुंबईत येऊ न देता नवी मुंबईतच अडविण्यासाठी तयारी राज्य सरकारने केली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मुंबई कृषीउत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलनकांनी तिथेच थांबावे यासाठी सरकारकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात देखील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईपर्यंत आंदोलन थांबावावे आणि  मोर्चा नवी मुंबईत थांबवून शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असा तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. तर हा मोर्चा सध्या लोणावळ्यात आहे. मात्र आता हा मोर्चा लोणावळ्यातच संपण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात सभेच्या ठिकाणावरून सर्व मराठा बांधवांना याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईला जाण्याचा दुपारपर्यंत निर्णय येणार आहे. अपेक्षित निर्णय आला नाही तर मुंबई रवाना होणार अशा सूचना देण्यात येत आहे.

मराठा आंदोलक आज नवी मुंबईत मुक्कामी, एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठ्यांचा पायी मोर्चा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मुक्कामासाठी येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाने नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. व्यापारी आणि माथाडी वर्गाने या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून मराठा आंदोलकांची सर्व व्यवस्था या एपीएमसी मार्केट आवारात करण्यात आला आहे.