देशात सर्वात जास्त चालणाऱ्या कारमध्ये दोष? आघाडीच्या कंपनीने परत मागवल्या 1.81 लाख कार

कंपीनेने आपल्या 5 मॉडेलच्या कार परत मागवल्या असून यासंदर्भात एक पत्रक जाहीर केलं आहे

Updated: Sep 3, 2021, 05:46 PM IST
देशात सर्वात जास्त चालणाऱ्या कारमध्ये दोष? आघाडीच्या कंपनीने परत मागवल्या 1.81 लाख कार  title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki) तब्बल 1 लाख 81 हजार कार परत मागवल्या आहेत. कंपनीने आपल्या 5 मॉडेलच्या पेट्रोल इंजिन प्रकारांमध्ये संभाव्य दोष शोधण्यासाठी शुक्रवारी हा रिकॉल ऑर्डर जारी केला.

या पाच मॉडेलमध्ये त्रुटी?

मारुती सुझुकीचं म्हणणं आहे की त्यांच्या Ciaz, Vitara Brezza, S-Cross, Ertiga आणि XL6 मॉडेल्सचं पेट्रोल इंजिन सदोष असण्याची शक्यता आहे. यामुळे कारच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून, कंपनी या मॉडेल्सच्या 1 लाख 81 हजार कारची तपासणी करेल आणि जर त्यात दोष आढळला तर तो दूर करण्यात येईल.

या काळातील गाडयांसाठी रिकॉल

मारुती सुझुकी कंपनीने एक पत्रक जाहीर केलं असून यात त्यांनी 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान तयार केलेल्या कारच्या या 5 मॉडेल्समध्ये हा दोष असू शकतो असं म्हटलं आहे. फक्त पेट्रोल इंजिन प्रकारात बिघाड होण्याची शक्यता आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की एकदा या गाड्या परत मागवल्या गेल्या की त्यांचे 'मोटर जनरेटर युनिट' तपासलं जाईल. जर त्यात काही दोष आढळला, तर कंपनी ग्राहकांना कोणतीही किंमत न मोजता दुरुस्ती करुन दिली जाईल.

नोव्हेंबरमध्ये सुरु होणार रिकॉल प्रक्रिया

मारुती सुझुकीने म्हटलं आहे की वाहनं परत मागवण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या महिन्यापासून सुरू होईल. नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं, अशी विनंती कंपनीने ग्राहकांना केली आहे.

यात तुमची गाडी आहे का, असं तपासा?

मारुती सुझुकीने असंही म्हटले आहे की ग्राहक त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मारुती नेक्साच्या (Maruti Nexa) वेबसाइटवर जाऊन त्यांचे वाहन रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही हे तपासू शकतात. यासाठी त्यांना वाहनाचे मॉडेल आणि चेसिस क्रमांक लागेल. ज्या वाहनमालकांना त्याच्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे, त्यांनी कंपनीच्या www.marutisuzuki.com (for Ertiga and Vitara Brezza) तसंच  www.nexaexperience.com (for Ciaz, XL6 and S-Cross) या वेबसाईटवर जाऊन ‘Imp Customer Info’ या भागाला भेट द्यावी.