मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण डाउन धिम्या मार्गावर स. ११ ते दु. ४ पर्यंत मेगा ब्लॉक असून मुलुंडहून सुटणारी डाउन धिम्या लोकल स.१०.४७ ते दु. ३.५ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या कालावधीत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावर थांबेल.
सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल स. ११ ते सायं. ५ वेळेत किमान १० मिनिटे उशीराने धावतील. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि बांद्रा या अप आणि डाउन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.४० वेळेत ब्लॉक आहे.
वाशी/बेलापूर/पनवेल ते सीएसएमटी/वडाळा मार्गावरील लोकल स. ११.३४ ते सायं. ४.४७ पर्यंत बंद राहील. तर सीएसएमटी ते पनवेल-बेलापूर-वाशी लोकल सेवा स. ९.५३ ते दु. ३.२० लोक सेवा बंद राहील. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून पनवेल आणि कुर्लासाठी विशेष लोकल सोडण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकादरम्यान स.१०.३० ते दु. ३.३५ वाजेपर्यत अप आणि डाउन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतुक सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.