MHADA Lottery : हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी मग सुरुवात होते ती म्हणजे अथक परिश्रमांची आणि अर्थातच सकारात्मक दृष्टीकोनानं काम करण्याची. अशा हक्काच्या घराची स्वप्न पाहणाऱ्यां अनेकांच्या पंखाना बळ देतं ते म्हणजे म्हाडा. घर घेण्याची इच्छा वगैरे ठीक, पण घरांच्या चढ्या किंमती पाहून घाम फुटत असतानाच काही प्रमाणात सवलती देत म्हाडाकडून सर्वसामन्यांसाठी विविध भागांमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात येतात. आजवर अनेकांनाच स्वत:चं घर मिळवून देणाऱ्या याच म्हाडा विभागाकडून आज नव्यानं सोडत काढण्यात येणार आहे.
म्हाडा कोकण मंडळाची सोडत 10 मे 2023 रोजी निघणार असून, यावेळी 4640 घरांसाठी 2023 मधील ही पहिली सोडत असणार आहे. प्राथमिक माहितीनुसार यावर्षी साडेचार हजार घरांसाठी तब्बल 48, 805 अर्ज आले आहेत. त्यामुळं आता भाग्यवान कोण ठरतं हे अवघ्या काही तासांचत कळणार आहे.
बुधवारी सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. यावेळी अर्ज सादर करताना म्हाडानं अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं होतं. असं असूनही अर्जदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या लॉटरीला मिळाला. तुम्ही कुठेही असाल, तरीही अगदी घरबसल्या म्हाडाची ही सोडत ऑनलाईनही पाहू शकाल.
bit.ly/konkan_mhada या लिंकवर क्लिक करून तुम्ही आहात त्या ठिकाणावरून वेबकास्टींगच्या माध्यमातून सोडत पाहू शरता. शिवाय सोडतीमध्ये नाव जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी म्हाडाकडून https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध केली जाणार आहे. विजेत्यांना म्हाडाकडून SMS करत याबातची माहितीसुद्धा देण्यात येणार आहे. विजेत्यांना म्हाडाकडून तात्पुरतं देकारपत्र आणि सूचनापत्रही देण्यात येणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं विविध योजनांतर्गत तयार केलेल्या घरांसाठी ही सोडत जाहीर होणार आहे. खोणी-कल्याण, शिरढोण, विरार-बोळिंज वगोठेघर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 984 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प गटाती लाभार्थ्यांचा समावेश आहे. इथं असणाऱ्या सदनिकांना केंद्राकडून 1.50 लाख आणि राज्याकडून 1 लाख रुपयांचं अनुदान मिलणार आहे.