मुंबई: संपूर्ण जगभर आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरू महिलावर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. '...करा विहार सामर्थ्याने!', असा मजकूर या फेसबुक पोस्टवर लिहला आहे.
तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील महिलांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आपण नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करत असल्याचे सांगितले. महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात नारी शक्ती पुरस्कार प्रदान होणार आहेत. या पुरस्कार विजेत्यांच्या यशोगाथा पंतप्रधान मोदी जाणून घेतील. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्रालयाने ताजमहालसह सर्व संरक्षित ठिकाणी महिलांना मोफत प्रवेश दिलाय.
दरम्यान, राज्यातही महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जान्हवी कपूर, जितेंद्र जोशी आणि रिंकू राजगुरू हे सेलिब्रिटी उपस्थित होते. तर कोल्हापुरात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या वतीनं शहरातील गांधी मैदान ते बिंदू चौक या दरम्यान महिलांची रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने हजेरी लावली होती.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे आज ते महिलादिनानिमित्त स्वत:च्या सोशल मीडियाचे सारथ्य महिलांकडे सोपवणार आहेत. सात कर्तृत्ववान महिलांना मोदींच्या सोशल मीडियावर स्वत:चे विचार मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.