'मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही', मनसेचा निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे. 

Updated: Jul 26, 2020, 04:21 PM IST
'मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही', मनसेचा निशाणा title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे. कुणाला कंटाळा आला, म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

'कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉक डाउन काढता येणार नाही--मुख्यमंत्री 100%सहमत पण कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून वाढवता ही येणार नाही', असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

आज कोरोनाची स्थिती तशी गंभीर आहे. मुंबईत नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र, धोका कायम आहे. अन्य शहरातही धोका कायम आहे. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन मी उठवतोय. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड्या करत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आरोग्य महत्वाचे आहे. कोरोनाबरोबर जगायला शिकायचे म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकले पाहिजे. त्यामुळे आता जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करत आहे. त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असले तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. कोरोनाच्या काळात या सर्वाचे तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.