एसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ?

एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  गप्प का, असा सवाल केला जात आहे. 

Updated: Oct 19, 2017, 03:48 PM IST
एसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ? title=

मुंबई : एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  गप्प का, असा सवाल केला जात आहे. 

एरवी मराठी माणसाच्या कल्याणासाठी आंदोलन करणारी शिवसेना आता मात्र गप्प आहे. गेल्या काही दिवसांत अंगणवाडी कर्मचारी, इंधनाचे वाढते दर यावर टीका आणि आंदोलनं करणारी शिवसेना एसटी संपावर मात्र बोलत नाहीय. परिवहन खातं शिवसेनेकडेच आहे. 

 

गेल्या तीन दिवसांत एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते अपयशी ठरलेले दिसतायत. विशेष म्हणजे फटाक्यांच्या बंदीवरही उद्धव ठाकरेंनी टीकेची झोड उठवली होती. आता मराठी माणूस त्याच्या घरी दिवाळीसाठी पोहोचू शकत नाहीय, अशी परिस्थिती असताना उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केला जातोय. 

दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान

एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक  फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत. 

एसटी महामंडळाचं मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलच्या आगारातून आज तिसऱ्या दिवशी एकही एसटी सुटलेली नाही. प्रवासी तुरळक संख्येने एसटी स्थानकावर आहेत. त्यांचे हाल होत आहेत. दरम्यान,  बुधवारी रात्री उशिरा एक वाजेपर्यंत  बैठक झाली. पण यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही. एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सकाळी दहापासून रात्री एकपर्यंत चर्चेच्या १३  फेऱ्या झाल्या. 

 

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटवला तरच आता पुढची बोलणी होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय. ४ हजार ते ७ हजारांपर्यंत पगारवाढ द्यायला प्रशासन तयार होतं, मात्र संघटनांना ही ऑफर अमान्य होती. जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न आम्ही केला, त्यासाठी २.५७ हजार कोटींचा प्रस्ताव ठेवला होता. यापुढे सरकारकडून एक रुपयाही वाढवून मिळणार नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते  यांनी स्पष्ट केले. मात्र, सेवा ज्येष्ठता आणि सातव्या वेतन आयोगावर एसटी कर्मचारी ठाम असल्याने संपावर तोडगा निघत नाही.