मोदींच्या मुंबईतील सभेला अनंत अंबानींची उपस्थिती; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे तोंडभरून कौतूक केले होते.

Updated: Apr 26, 2019, 08:16 PM IST
मोदींच्या मुंबईतील सभेला अनंत अंबानींची उपस्थिती; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या  title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत होत असलेल्या सभेच्या ठिकाणी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी उपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर मोदी युतीच्या सभेसाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये सभेच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अनंत अंबानी यांची छबी कैद झाली. 

काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी भाजपकडे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मुकेश अंबानी यांनी देशातील बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून हे पाऊल उचलल्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र, आता अनंत अंबानी थेट नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी उपस्थित राहिल्याने आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच अनंत अंबानी याठिकाणी नेमके कशासाठी आले होते, याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.