मुंबईत १६ हजार फेरीवाल्यांना परवाना मिळणार

मुंबईत आता अधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढणार 

Updated: Jan 2, 2020, 11:24 PM IST
मुंबईत १६ हजार फेरीवाल्यांना परवाना मिळणार title=

मुंबई : मुंबईत आता अधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढणार आहे. सुमारे १६ हजार फेरीवाल्यांना परवाना दिला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या आहेत. या फेरीवाल्यांना परवाना देण्याची प्रक्रिया येत्या दीड महिन्यांत सुरु केली जाणार आहे.

पात्र फेरीवाल्याला कुठे जागा दिली आणि कुठला व्यवसाय ते करीत आहेत, याची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेले फेरीवाला धोरण आता मार्गी लागणार आहे. मुंबईत सध्या १७ हजार अधिकृत फेरीवाले आहेत त्यात आता १६ हजारांची भर पडणार आहे.

फेरीवाला धोरणासाठी २०१४ साली फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा एकूण ९९ हजार ४३४ फेरीवाल्यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते, पण त्यातील सुमारे ५१,७८५ फेरीवाल्यांनी पालिकेकडे कागदपत्रे सादर केली होती. त्यापैकी छाननीनंतर १५ हजार ८९७ फेरीवाले पात्र झाले असून त्यांच्यासाठी ३०,८३२ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

मंदिर आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना परवाना देण्यात येणार नाही. या परिसरात फक्त पूजेचे साहित्य विकण्यासाठीचा परवाना दिला जाणार आहे. एका पिचवर जास्त फेरीवाले इच्छुक असतील तर रोस्टर पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळात फेरीवाल्यांना जागा वापरायला दिल्या जाणार आहेत.