मुंबई: मुंबई आणि पुण्यातील चाकरमन्यांनी कोकणात परतण्याची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी म्हटले की, अनेकजण लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर नाराज आहेत. शहरातील अनेक लोकांना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात असणाऱ्या आपापल्या गावी परतायचे आहे.
राज्य सरकार परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जायला परवानगी देते. मग आम्हाला का नाही, असा सवाल या लोकांकडून विचारला जात आहे. परंतु, कोकणाला कोरोनापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर चाकरमन्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या काळात कोकणात आंबे, काजू अशी चंगळ असते. अनेक कोकणावासीय आपल्या कुटुंबीयांसोबत गावी जातात. मात्र, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ते शक्य नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईतून रत्नागिरीत गेलेले काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोकणातील कोविडमुक्त भागातही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे सरळ उठून आपल्या गावी चालायला लागलात, असे करु नका. थोड्या दिवसांनी तुम्हालाही गावी सोडण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
'भूमिपूत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा, उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा भासून देऊ नका'
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. आपण मार्च महिन्यापासून राज्यात काळजी घेतली. ही काळजी घेतली नसती तर आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला असता. आतापर्यंतच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली गेली नसली तरी आपण कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.