गोविंद तुपे, झी 24 तास,मुंबई: प्रचंड गाजावाजा करत कोस्टल रोड सुरू करण्यात आला. कोस्टल रोडवरून रंगलेली श्रेयवादाची लढाई अवघ्या महाराष्ट्राने बघितली. मात्र काही दिवसाच्या आतच कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागलीय. त्यामुळं बोगद्याच्या भिंतीमधून पाणी झिरपायला लागलंय. 11 मार्च 2024ला म्हणजे केवळ 2 महिन्यांआधी कोस्टल रोड वाहतुकीला खुला करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
मुंबईच्या सागर किनाऱ्याने दक्षिण-उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतुक कोंड़ीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 8 मार्गिकांच्या रस्त्याला लागूनच लोकांना चालता येईल असा मार्ग, पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.
उद्घाटनानंतर 2 महिन्यांच्या आत रस्त्याची दुर्दशा झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मताच्या जोगव्यासाठी घाईघाईने या रोडचं उद्घाटनही कऱण्यात आलं. मात्र त्याची कुठलीच प्री मान्सून चाचणी झाली नसल्याची माहीती समोर येतेय. एवढच नाही तर या प्रकल्पाला ना कंम्प्लायन्स सर्टीफिकेट मिळालय, ना सीसी. फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवूण लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप आमदार सचिन अहिर यांनी केलाय.