भावाच्या अंत्यसंस्काराला न आल्याच्या रागातून मुंबईतील मायलेकीवर जीवघेणा हल्ला; एकीचा मृत्यू

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक करत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 29, 2023, 03:05 PM IST
भावाच्या अंत्यसंस्काराला न आल्याच्या रागातून मुंबईतील मायलेकीवर जीवघेणा हल्ला; एकीचा मृत्यू title=
(फोटो सौजन्य - PTI)

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : भावाच्या अंत्यविधीला (funeral) न आल्याने चौघांनी तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री गोवंडीत (Mumbai Crime) घडली आहे. याबाबत देवनार पोलिसांनी (Devnar Police) हत्येचा गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे. या खळबळजनक घटनेत एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच नातेवाईकांनी हत्या केली तर तिच्या वाचवायला आलेल्या 50 वर्षीय आईवर कुटुंबातील सदस्यांनी वार केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ही सगळी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड परिसरात राहणाऱ्या अंजली भोसले यांचे कुटुंब परिसरातील कृष्णा पवार यांच्या भावाच्या अंत्यविधीसाठी गेले नव्हते. यावरून दोन्ही कुटूंबात मोठा वाद झाला. यावेळी कृष्णा पवार (28), जगमित्र भोसले (35), अनिता भोसले (32) आणि आतेशा पवार (25) यांनी अंजलीची आई, तिचा भाऊ आणि वहिणीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये तक्रारदार अंजलीची हिची वहिनी काजल पवार हिचा मृत्यू झाला आहे. देवनार पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून चारही आरोपीना अटक केली आहे.

मंगळवारी रात्री काजल आणि वैशाली त्यांच्या झोपडीत बसल्या असताना, आरोपी कृष्णा पवार आणि त्याची पत्नी अनिशा, जगमित्रा भोसलेची पत्नी अनिता असे चौघेजण चाकू घेऊन पीडितेवर हल्ला करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी भावाच्या अंत्यविधीला का आला नाहीत असा सवाल केला. वाद सुरू असताना त्यांनी आधी काजलच्या डोक्यावर दगडाने वार केले आणि नंतर तिच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. आपल्या मुलीवर हल्ला होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैशाली यांच्या पोटात आणि पाठीवरही आरोपी अनिता आणि अनिशा यांनी वार केले.

त्यानंतर काजल बेशुद्ध पडताच सर्व आरोपी तिथून पळून गेले. त्यानंतर वैशाली यांची धाकटी मुलगी अंजली भोसले जेव्हा घरी परत आली तेव्हा तिला तिची बहीण आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. अंजलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले आले. तर वैशाली यांचा जीव वाचला आहे. त्यानंतर अंजलीने देवनार पोलिसात जाऊन आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली.

दरम्यान, बुधवारी दुपारी पोलिसांनी चार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.