मुंबई: राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिसरात शुक्रवारी कोरोनाचे आणखी १५ रुग्ण आढळून आले. तर उपचार सुरु असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता शंभरपार जाऊन पोहोचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा दहा इतका झाला आहे.
मोठी बातमी : लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला
आज दुपारपर्यंतची कोरोनाबाधितांची आकडेवारी मुंबईसह राज्याला दिलासा देणारी होती. गेल्या कित्येक दिवसांमध्ये शुक्रवारी पहिल्यांदाच राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटताना दिसली. काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते आज दुपारपर्यंत संपूर्ण राज्यात कोरोनाचे केवळ ३४ नवे रुग्ण आढळून आले होते. यामध्ये मुंबईतील अवघ्या सहा रुग्णांचा समावेश होता. मात्र, संध्याकाळपर्यंत यामध्ये आणखी नऊ रुग्णांची भर पडल्याने चिंतेचे वातावरण अजूनही कायम आहे.
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा
आतापर्यंत धारावीतील मुस्लिमनगरमध्ये सर्वाधिक २१ तर मुकूंदनगरमध्ये १८ रुग्ण आढळून आले आहेत. तर डॉ. बालिगा नगर आणि सोशल नगरमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. धारावीतील कोरोनाबाधितांच्या या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.