मुसळधार पावसाचा लोकल ट्रेनला फटका

मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Updated: Jul 16, 2021, 09:28 AM IST
मुसळधार पावसाचा लोकल ट्रेनला फटका title=

मुंबई : मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चेंबूर, हिंदमाता, सायन, कुर्ला यांसारख्या अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलेलं पहायला मिळालं. दरम्यान या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनला देखील बसलेला दिसतोय. यामध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

आजच सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक पहायला मिळाला. हिंदमाता, सायन, कुर्ला, अंधेरी सब-वे मध्ये पाणी साचलं आहे. तर उपनगरांमध्येही पावसाची संततधार आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टी या ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतुक काही काळ ठप्प देखील होती. मात्र थोड्यावेळातच थिम्या गतीने वाहतूक सुरु करण्यात आली.

सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि विद्याविहार इथल्या स्टेशनच्या धिम्या गतीच्या रूळांवर पाणी साचलं आहे. यामुळे रेल्वे 20-25 मिनिटं उशीराने आहेत. याचप्रमाणे काही लोकल ट्रेन फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्यात.

तर हार्बर लाईनवरील लोकल ट्रेन देखील 20-25 मिनिटं उशीराने धावतायत. आणि ट्रान्स हार्बरवरील रेल्वे वाहतूक उशीराने धावत असल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.