मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊल

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 19, 2024, 09:33 AM IST
मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊल title=
Mumbai local train update central railway Will increase the width of the platform for 15th coach local

Mumbai Local Train Update: मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून सतत रखडत धावत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळं चारकमान्यांना कामावर पोहोचण्यासाठी उशिर होतो. गेल्या काही दिवसांपासून लोकलच्या प्रवासी संघटनांनी लोकलच्या या काराभारावर निषेध नोंदवला होता. तर, 22 ऑगस्ट रोजी अनेक प्रवासी संघटना काळ्या फिती लावून प्रवास करणार आहेत. लोकलच्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनही प्रयत्न करत आहेत. लवकरच लोकलमधील गर्दीची चिंता मिटणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

कल्याणपासून कर्जत आणि कसारापर्यंत 15 डब्यांच्या लोकल थांबवता याव्यात म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढवण्यात यावा, अशी मागणी कित्येक दिवसांपासून सुरू आहे. यावर रेल्वेने सकारात्मकता दर्शवली आहे. प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा सर्व्हे मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यास कर्जत, कसाऱ्याहून भरुन येणाऱ्या लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 

मध्य रेल्वेवरील कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून लोकल पकडणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. लोकलमध्ये चढण्यासाठीही खूप गर्दी असते. त्यामुळं अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. यावर उपाय म्हणून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.  त्याचबरोबर, लोकलच्या मार्गावरुन मेल एक्सप्रेसऐवजी लोकलच सोडाव्यात अशी मागणीही करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता प्लॅटफॉर्मची रुंदी वाढावी, याची चाचपणी करण्यात येत आहे. 

टिटवाळा आणि बदलापूरहून 15 डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात. तसंच, कळवा व मुंब्रा स्थानकात सकाळ संध्याकाळ काही जलद लोकलना थांबा मिळावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. 

प्रवासी संघटनाचे आंदोलन

लोकल प्रवाशांची गर्दीही वाढली. त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे स्थानकातून लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात, या प्रश्नावर प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 22 ऑगस्ट रोजी प्रवासी काळ्या फिती लावून लोकल प्रवास करणार आहेत.