प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 1, 2024, 11:29 AM IST
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल title=
Mumbai Local Train Update Malad station platform changes due to infrastructure work

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर सध्या मोठा ब्लॉक घेण्यात येत आहे. शनिवार आणि रविवारी 10 तासांचा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मात्र, हा ब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येत आहे. सहाव्या मार्गिकेच्या कामामुळं हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Malad Railway Station)

पश्चिम रेल्वेवर मलाड स्थानकात सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी शनिवारी दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बो ब्लॉक गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांदरम्यान असणार आहे. या ब्लॉकनंतर मालाड स्थानकात चढण्या उतरण्याच्या फलाटांमध्ये बदल होणार आहेत. म्हणजेच बोर्डिंग आण डिबोर्डिंगमध्ये बदल झाला आहे. नेमक्या कोणत्या फलटांमध्ये बदल झाला आहे. हे जाणून घेऊया. 

प्लॅटफॉर्म क्रमांक 1: फलाट क्रमांक 1 वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. मात्र आता यात बदल झाला आहे. प्रवाशांचा चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून हे बदल होणार आहेत. 

प्लॅटफॉर्म 2: 8 सप्टेंबरपासून चर्चगेटला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या व उतरण्यासाठी करावा लागणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म 2 वर अंधेरी, वांद्रे आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या येतात. 

प्लॅटफॉर्म 3:  प्लॅटफॉर्म 3 वर चर्चगेटकडून येणाऱ्या जलद गाड्याचा थांबा आहे. या फलाटावर डाव्या बाजूने प्रवाशांना चढण्याची व उतरण्याची सोय आहे. मात्र, 22 सप्टेंबर 2024पासून प्रवाशांना उजवीकडे चढण्याची व उतरण्याची व्यवस्था असणार आहे.

प्लॅटफॉर्म 4: प्लॅटफॉर्म 4वर चर्चगेटच्या दिशेने जलद गाड्याचा थांबा आहे. सध्या डाव्या बाजूला प्रवाशांना चढण्याची व उतरण्याची सोय आहे. आता त्यात बदल होणार असून प्रवाशांना उजव्या बाजूला चढावे व उतरावे लागणार आहे. 29 सप्टेंबरपासून हा बदल होणार आहे. 

दरम्यान, मालाड स्थानकातील हे बदल पश्चिम रेल्वेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. प्रवाशांनी याबदलांबद्दल जागरुक राहावं, असं अवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. त्यानुसारच प्रवासाचं आयोजन करावं, असं रेल्वेने म्हटलं आहे. 

सहाव्या मार्गिकेचा काय फायदा होणार?

सहाव्या मार्गिकेमुळं लोकलवरील ताण हलका होणार आहे. तसंच, सध्या वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव या नऊ किमीच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा गोरेगाव- कांदिवली दरम्यानचा आहे. यानंतर कांदिवली ते बोरीवलीदरम्यानचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात येणार आहे.