उंदरानं 10 तोळं सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लांबवली

मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय.

Updated: Jun 16, 2022, 11:47 PM IST
उंदरानं 10 तोळं सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लांबवली title=

गणेश कवडे झी 24 तास मुंबई  : तुम्ही चोरीचे अनेक किस्से ऐकले असतील. पण उंदरानं दागिने चोरल्याचं ऐकलंय का? एका उंदरानं तब्बल 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबवले. पोलिसांनी त्याला कसं पकडलं, बघुयात. (mumbai mouse gold thief know police how to search jwellery) 

मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. एका महिलेचे हरवलेले 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढण्याचा पराक्रम केलाय. हे दागिने कुणा चोरट्यानं नव्हे तर चक्का एका उंदराने लांबवले होते. 

त्याचं झालं असं की मुंबईतल्या दिंडोशी भागात राहणारी सुंदरी नावाची महिला बँकेत दागिने ठेवण्यासाठी निघाली होती. वाटेत तिनं एका भिकारी महिलेला आणि तिच्या मुलाला वडापावची थैली दिली. मात्र तिथून जाताच आपण वडापावसोबत सोन्याचे दागिनेही दिल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर सुंदरी यांनी भिकारी महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

मात्र ती महिला आणि तिचा मुलगा सापडलाच नाही. अखेर सुंदरी यांनी दिंडोशी पोलिसांत धाव घेतली. मग सुरू झाली तपासाची सूत्र...पोलिसांनी भिकारी महिलेचा शोध घेतला. तेव्हा तिनं वडापाव कच-याच्या ढिगा-यात फेकून दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा या महिलेनं वडापावची थैली फेकल्याचं दिसून आलं. 

हीच ती थैली ज्यात वडापावसोबत सोन्याचे दागिनेही होते.  पोलिसांनी कच-याच्या ढिगा-यात शोध घेतला मात्र दागिने सापडले नाहीत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही बारकाईनं तपासलं असता एक उंदीर ही पिशवी पळवताना दिसून आला. आधी हा उंदीर कचराकुंडीभोवती इथं तिथं फिरत राहिला. नंतर हा उंदीर बाजुच्या नाल्यात घुसला आणि पोलिसांना इथच नवा धागा सापडला. नाल्यात शोध घेतला असता तिथच सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सापडली. 

एका उंदारानं वडापावसाठी तब्बल 10 तोळं सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लांबवली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेला तिचे दागिने परत मिळाले. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.