बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Best Bus : बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 27, 2023, 06:13 PM IST
बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय title=
(फोटो सौजन्य - PTI)

मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या (Mumbai News) बेस्ट बसमधून (BEST Bus) तुम्ही प्रवास करत असताना मोबाईलवर गाणे, व्हिडीओ मोठ्या आवाजात ऐकत असाल किंवा मोठ्याने बोलत असला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाही होणार आहे. त्यामुळे आता बेस्ट बसमधून प्रवास करताना अशा प्रवाशांनी सावध होणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने (BEST) बसमध्ये प्रवास करताना लोकांना मोबाईल फोनवर मोठ्याने बोलण्यास आणि मोबाइलवर ऑडिओ/व्हिडिओ हेडफोनशिवाय ऐकण्यास मनाई केली आहे.

बेस्टच्या वाहतूक विभागाकडून हे पत्रक काढण्यात आले असून मुंबईतल्या सर्व बेस्ट आगारांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण रस्त्याने जाताना किंवा प्रवास करताना मोबाईल वर मोठ्या आवाजात बोलतात. याचा त्रास सर्वांनाच होत असतो. बेस्ट बसमधून प्रवास करणारे काही प्रवासीसुद्धा मोठ्या आवाजात बोलतात, गाणी वाजवतात किंवा व्हीडिओ बघत असता. याचा आवाज मोठा असतो याचा त्रास सहप्रवाशांना होतो. या संदर्भात प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आता अशा प्रवाशांवर कारवाई होणार आहे.

बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलणे, इअरफोनशिवाय गाणी ऐकणे टाळा. नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने हा निर्णय घेतला आहे, असे बेस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींवर कारवाई करत, बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला असून 24 एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. तसेच सर्व बसेसवर ही अधिसूचना लावण्यास सांगितले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबईतल्या सर्वच आगारात सूचना देऊन इअरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ व्हीडिओ गाणी वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. अशा प्रकारचे कृत्य करताना कोणता प्रवासी आढळल्यास त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा 38 /112 नुसार कारवाही करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार शांतता भंग केल्याप्रकरणी प्रवाशांना दंड ठोठवण्यात येणार आहे.

दरम्यान, सुमारे 3,400 बसेसचा ताफा असलेले बेस्ट प्रशासन मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवते. बेस्टच्या बसमधून दररोज 30 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात.

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्येही बंदी

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी मनोरंजनासाठी मोठ्या गप्पा मारणे, गाणी ऐकणे असे काही करत असताता. भारतीय रेल्वेने आता रात्री प्रवास करताना असे कृत्य करणाऱ्यांवर नव्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.