मुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये बुधवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी हे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 4, 2024, 03:18 PM IST
मुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Mumbai Local : गेल्या काही वर्षांपासून मुंबईवर ताण वाढत चालला आहे. या ताणाच परिणाम इथल्या वाहतूक सेवेवर देखील होत आहे. दुसरीकडे या गर्दीला आवरण्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील अपुरी पडत आहे. त्यामुळेच मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, मुंबई रेल्वे विकास महामंडळ यंत्रणांनी एकत्र येत प्रयत्न केले आहे. तसेच गर्दीतून प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठी शून्य मृत्यू मोहीम देखील राबवण्यात येत आहे. मात्र मृत्यूसत्र थांबताना दिसत नाहीये.

मुंबई उपनगरीय लोकलच्या गर्दीमुळे एकाच दिवसात तब्बल चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान बुधवारी गर्दीच्या वेळी या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन ठरलेली लोकल सेवा मुंबईकरांसाठी असुरक्षित ठरू लागली आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातांत घट झाली असली तर उशीराने धावणाऱ्या लोकलमुळे अनेकांना अद्यापही आपला जीव गमवावा लागत आहे.

बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास डोंबिवलीहून महिलांच्या डब्यात 40 वर्षे वयाची एक महिला चढली तेव्हा पहिली दुर्घटना घडली. डोंबिवली ते कोपर दरम्यान ट्रेनच्या धडकेत तिचा तोल गेला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काही मिनिटांनीच सकाळी 8.30 च्या सुमारास डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल ट्रेनमध्ये चढलेली सुशील पुथरण नावाची 45 वर्षीय व्यक्ती डोंबिवली आणि कोपर स्थानकांदरम्यान रुळांवरून पडली. सुशील यांना उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर दिवसभरात कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रवाशांबद्दल माहिती समोर येऊ शकली नाही.

दुसरीकडे, मुंबईच्या लोकल सध्या गर्दीसाठी कुप्रसिद्ध झाली आहे. ट्रेन चुकू नये म्हणून दरवाजाबाहेर लोंबकळत असलेल्या लोकांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई लोकलमध्ये सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 या वेळेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वेत शिरण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण दरवाजावर लटकून प्रवास करतात. गर्दीमुळे दरवाजावरील प्रवासी बाहेर फेकले जातात आणि त्यात अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागतो. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 10 ते 20 मिनिटांनी आणि एक्स्प्रेस 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकल 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळेही प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.