Whale Vomit Ambergris : तुम्ही कधी कोणत्या जनावराने केलेली उलटीची विक्री होताना पाहिले आहेत का? बाजारात जनावरांची उलटी कोटी रुपयांमध्ये का विकली जात असेल याचा तुम्ही विचार केला आहे का? असाच काही प्रकार मुंबईमध्ये समोर आला आहे. व्हेल माशाची उलटीची (Whale Vomit) बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
व्हेल माशाला वन्यजीव संरक्षण कायदा अन्वये संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 'फ्लोटिंग गोल्ड’ किंवा अॅम्बरग्रीस (Ambergris) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र व्हेल माशाच्या उलटीची किंमत बाजारात सोन्या किंवा हिऱ्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने याची विक्री केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
मुंबईतही अशाच प्रकारे व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना (Mumbai Police) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी घेऊन ती विक्री साठी ऑबेरॉय हॉटेल समोर येणार होती. पोलिसांनी याप्रकरणी वैभव जनार्दन कालेकर या व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून २ किलो ६१६ ग्रॅम वजनाचे अॅम्बरग्रीस जप्त केले आहे. याची किंमत दोन कोटी साठ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी करत आहेत.
अॅम्बरग्रीस म्हणजे काय?
अॅम्बरग्रीस, म्हणजे फ्रेंचमध्ये त्याचा अर्थ राखाडी अॅम्बर असा आहे. हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो संरक्षित शुक्राणू व्हेलच्या पचनमार्गातून तयार होता. मात्र याला चुकीच्या पद्धतीने ‘व्हेल माशाची उलटी’ असे संबोधले जाते. व्हेल माशाच्या उलटीला अॅम्बरग्रीस म्हणतात. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एक प्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.
अॅम्बरग्रीस हे विष्ठासारखे बाहेर पडते असे म्हटले जाते आणि त्याला तीव्र सागरी गंधासह अतिशय तीव्र विष्ठेचा गंध असतो. काहीवेळा त्याचा रंग तपकिरी आणि काळा असतो.
अॅम्बरग्रीस इतके महाग का आहे?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार याची किंमत १ ते २ कोटी रुपये प्रति किलोग्राम आहे. ते त्याची शुद्धता आणि गुणवत्तेनुसार अवलंबून आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे अत्यंत दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि किंमतही जास्त आहे.
पारंपारिकपणे, अॅम्बरग्रीसचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. पूर्वीच्या काही संस्कृतींमध्ये खाद्यपदार्थ, अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखूमध्ये चव येण्यासाठी त्याचा वापर केल्याच्या नोंदी आहेत. पण सध्या यासाठी ते क्वचितच वापरले जाते.