मुंबई: येत्या पाच दिवसात मुंबई, कोकण आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर रविवारी रात्रभर कायम होता. आज (सोमवार, २ जुलै) सकाळीही पश्चिम उपनगरात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. तूर्तास लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. पावासाचा जोर ओसरल्यावर पाण्याचा निचरा संध्याकाळी झाला. संततधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचलं. हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, सायन, अँटॉप हिल, बैलबाजार कुर्ला, शीतल सिनेमा, वांद्रे नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, बीकेसी परिसरात पाणी तुंबलं... त्यामुळं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं.
रायगड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळनं वर्तवलाय. रायगडमध्ये रविवारी धुवांधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाला. जिल्ह्यातल्या आंबा आणि सावित्री नदीत पाण्याचा मोठा प्रवाह पाहायला मिळाला. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेवून रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू आहे.