मुंबई : २९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात लोकांची मदत करणा-या पोलिसांना ५ कोटी रुपयांचं इनाम राज्य सरकारने जाहीर केलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.
अशा स्थितीत मुंबई पोलीस दलातील अनेक पोलीस हे दोन दिवस लोकांची मदत करण्यासाठी जागोजागी हजर होते.
२९ ऑगस्टच्या आणि गेल्या काही महिन्यात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून हे पारितोषिक देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव (२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर) आणि बकरी ईद (२ सप्टेंबर) या कालावधीत जातीय सलोखा राखल्याबद्दलही सरकारने पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
पोलीस महासंचालकांना बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांमध्ये पारितोषिकाची रक्कम वाटून दिली जाणार आहे. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीतील त्यांच्या कामाचा विचार करुन हे बक्षीस देण्यात येईल.