मुंबई : मुंबईतल्या वरळी सी फेस भागातला एक फ्लॅट तब्बल साडे त्रेपन्न कोटी रूपयांना विकला गेलाय. म्हणजेच प्रति चौरस फूट सव्वा दोन लाख रूपये. एवढं काय आहे या फ्लॅटमध्ये. दर्या किनारी बंगला असेल तर क्या बात. पण प्रत्येकाच्याच नशिबी असा योग नसतो. मग काय बंगल्याची तहान भागवली जाते ती फ्लॅटवर. मुंबईतल्या वरळी सी फेसच्या दिशेनं असलेल्या अशाच एका फ्लॅटसाठी शहा कुटुंबियांनी किती रूपये मोजले माहित आहे..? चक्क साडे त्रेपन्न कोटी रूपये.
वरळी सीफेससमोरच शॅम्पेन हाऊस नावाची छोटी इमारत आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावरील उत्तर दिशेला 1 क्रमांकाचा फ्लॅट आहे.
सुमारे 2 हजार 300 चौरस फुटाचा हा फ्लॅट शहा कुटुंबियांनी साडे त्रेपन्न कोटी रूपयांना विकत घेतला.
फ्लॅटचे नवे मालक डॉ. अभ्युदय शहा आणि क्वांटिको रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश सुतार यांच्यात गेल्या आठवड्यात हा खरेदी-विक्री व्यवहार झाला.
त्यासाठी शाह कुटुंबियानी सरकारी तिजोरीत तब्बल 2 कोटी 67 लाख रूपये एवढं मुद्रांक शुल्कही भरलं.
या फ्लॅटसोबत शाह कुटुंबियांना तळमजल्यावरचं गॅरेजही वापरायला मिळणाराय.
विशेष म्हणजे सरकारी रेडी रेकनर दरानुसार या फ्लॅटची किंमत आहे केवळ 13 कोटी 28 लाख रुपये...
वरळी सी फेस परिसरात याआधी एवढ्या फ्लॅटसाठी सुमारे 16 कोटी रूपये किंमतीचे व्यवहार झालेत.
समुद्र महल ही वरळी सीफेस भागातील सर्वात पॉश इमारत समजली जाते. मात्र या इमारतीतल्या फ्लॅटपेक्षाही जास्त किंमतीनं शॅम्पेन हाऊसमधला हा फ्लॅट विकला गेल्यानं रिअल इस्टेट व्यवसायात आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
गेल्या 40 वर्षांपासूनच याच इमारतीत राहत असलेल्या शाह कुटुंबियांना हाच फ्लॅट घ्यायचा होता.... त्यासाठी अगदी तिप्पट किंमत मोजून त्यांनी तो खरेदीही केला... हौसेला मोल नसतं, हेच खरं.