Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. बीएमएस, बॅफ, बीबीआय, बीएफएम, बीएससी सत्र ६ व एलएलबी सत्र ६ व सत्र १० ची परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून अपडेट देण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या उन्हाळी सत्राच्या बीएमएस, बॅफ, बीबीआय, बीएफएम, बीएससी सत्र ६ व एलएलबी सत्र ६ व सत्र १० या सात परीक्षेचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून याचे निकाल लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळी सत्राची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करीयरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. एप्रिल मे २०२३ या कालावधीत अंतिम वर्षाच्या सत्र ६, सत्र ८ व सत्र १० च्या परीक्षा संपन्न झाल्या. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन वेळेवर होणे आवश्यक आहे. हे मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे व परीक्षा संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यानी मूल्यांकन करून घेण्यात सक्रिय सहभाग दाखविला. तसेच शिक्षकांनीदेखील उन्हाळी सुट्टीत देखील उत्तरपत्रिकांचे मोठ्या प्रमाणावर मूल्यांकन केले आहे. यामुळेच या सात परीक्षेचे मूल्यांकन वेळेवर पूर्ण झाले आहे. या परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली.
तसेच अभियांत्रिकी परीक्षा सत्र १ चे निकाल विद्यापीठाने जाहीर केले असून यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ४ जुलै पासून सुरू होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.