Mumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती जाहीर केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्या.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी या भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/2023-24/853, दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार सदर पदांकरीता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजण्याच्या आत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास तो बाद करण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या.