स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : रागाच्या भरात कोणी कोणत्या स्तरावर जाईल याची काही कल्पना नाही. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडलाय. नवी मुंबईत (Navi Mumbai Crime) एका सुरक्षा रक्षकाची क्षुल्लक कारणावरुन दगडाचे ठेचून हत्या केली आहे. माचिस दिली नाही म्हणून राग आल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाला ठार केले आहे. पोलिसांनी (Navi Mumbai Police) आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रसाद भानुशाली असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो नेपाळचा आहे. तर मोहम्मद आदिल असब अली असे आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुर्भे नका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर प्रसाद भानुशाली सुरक्षा रक्षकाची एका शुल्लक कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद अली याला अटक केली असून,त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मोहम्मद अली याने मयत सुरक्षा रक्षक प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली होती. मयत भानुशाली याच्याकडे माचिस नसल्याने त्याने असब अलीला नकार दिला. केवळ एवढ्याच कारणावरुन असब अलीला प्रचंड राग आला. त्याने रागाच्या भरात भानुशाली याच्या डोक्यात दगड घालून त्याला जागेवरच ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.मात्र सिगारेट पेटवण्यासाठी माचिस दिली नाही म्हणून भानुशालीची हत्या केली याची कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"तुर्भे नाका इथे मोहम्मद आदिल असब अली या युवकाने तिथे काम करणाऱ्या एका नेपाळचा सुरक्षा रक्षक असलेल्या प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचिसची मागणी केली होती. पण भानुशालीकडे माचिस नसल्याने विरोध केला. याच रागातून असब अलीने भानुशाली याच्या डोक्यात दगडाने वार करुन खून केला आहे. आरोपी असब अलीला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
नातेवाईकाला पाहायला गेलेल्या महिलेचे दागिने चोरीला
पनवेलमध्ये आजारी नातेवाईकाला पाहायला गेलेल्यामहिलेचे चार लाखांचे दोन मंगळसूत्र सोनसाखळी चोराने लांबवले आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 18 इथल्या रस्त्यावर सोनसाखळी चोराने फळे खरेदी करुन पतीच्या दुचाकीवर बसणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला. कामोठे पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे.