उत्तरप्रदेश ते डोंगरी, भंगारवाला ते मंत्री! नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सातत्याने चर्चेत असलेल्या नवाब मलिक यांची राजकीय कारकिर्द  

Updated: Feb 23, 2022, 05:35 PM IST
उत्तरप्रदेश ते डोंगरी, भंगारवाला ते मंत्री! नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यांतर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॅशिंग नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अल्पसंख्याक मंत्री पद मिळालं. नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक, उद्योजकता आणि कौशल्य विकास खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपद तसंच मुंबई शहराध्यक्षपदही ते सांभाळतात.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक सातत्याने चर्चेत राहिले. सातत्याने पत्रकार परिषद घेत त्यांनी आर्यन खानला अटक करणाऱ्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी सातत्याने निशाणा साधला. 

नवाब मलिक यांचा जन्म
नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तरप्रदेशमधलं असून तिथे त्यांची शेती आणि इतर व्यवसाय  उत्तर प्रदेशमधल्या बलरामपुर जिल्ह्यातल्या रुसवा गावात 20 जून 1959 रोजी नवाब मलिक यांचा जन्म झाला. नवाब मलिक यांचे वडिल मोहम्मद इस्लाम मलिक हे मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर ते डोंगरीत वास्तव्याला होते.  गेल्या 50 ते 60 वर्षांपासून त्यांचा भंगारचा व्यवसाय आहे. 

राजकारणात येण्यापूर्वी नवाब मलिक यांनीही पंधरा ते वीस वर्ष भंगारचा व्यवसाय सांभाळला. 1980 साली नवाब मलिक यांचं मेहजबीन यांच्याशी लग्न झालं, त्यांना चार मुलं आहेत. फराज आणि आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. 

नवाब मलिक यांचं शिक्षण
नवाब मलिक यांनी डोंगरीच्याच एका शाळेत सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर अंजुमन इस्लाम शाळे त्यांनी अकरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे बुऱ्हाणी कॉलेजमध्ये यांनी बीएपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांना बीएची अंतिम परीक्षा देता आली नाही.

राजकारणाची पहिली पायरी
महाविद्यालीय काळात त्यांनी फी वाढी विरोधात झालेल्या एका आंदोलन सहभाग घेतला होता. त्यांच्या राजकीय प्रवासाची ही पहिली पायरी होती. 1980 मध्ये काँग्रेस नेत संजय गांधी यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी संजय विचार मंचाची स्थापना केली. नवाब मलिक या मंचाशी जोडले गेले. लोकसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी संजय विचार मंचातर्फे निवडणूकही लढवली होती. पण या निवडणुकीत नवाब मलिक यांना केवळ 2620 मतं मिळाली. 

काँग्रेसशी जोडले गेले
यानंतर नवाब मलिक यांनी काँग्रेस पक्षाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. 1991 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून तिकिट मागितलं, पण त्यांना तिकिट नाकारण्यात आलं.

समाजवादी पक्षात प्रवेश 
यानंतर नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य मुस्लीम मतदार असलेल्या नेहरुनगर भागातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवली. पण नवाब मलिक यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी विजय संपादन केला. 

पण धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या प्रकारणात सूर्यकांत महाडिक दोषी आढळले आणि 1996 साली नेहरु नगर मतदार संघात पोट निवडणूक झाली. यात नवाब मलिक यांनी दणदणीत विजय मिळवला. पुढे 1999 मध्ये नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला. 

नवाब मलिक यांची सत्तेत वर्णी
1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. समाजावदाी पक्षाकडून विजयी झालेल्या दोन आमदारांनी आघाडी पाठिंबा दिला. याचं बक्षीस म्हणून नवाब मलिक यांची गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. कालांतराने समाजवादी पक्षातील मतभेदांमुळे नवाब मलिक यांनी 2001 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

2005-06 दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये नवाब मलिक यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. माहिमच्या चाळ पुनर्विकासात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठपुरावा केला होता. पण 2008 मध्ये त्यांना पुन्हा मंत्रीपद बहाल करण्यात आलं.

नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई
नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती समीर खान यांना ड्रग्सची तस्करी आणि मनी लॉन्ड्रींगच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली. सूडबदुध्दीने कारवाई होत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.  १४ ऑक्टोबरला समीर खान यांना जामीन मिळाला. 

नवाब मलिक यांना अटक
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्य इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आज सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आलं.