नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.  

Updated: Nov 29, 2019, 08:46 AM IST
नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही आज आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे शेतकऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हणालेत, मी एक चांगले सरकार देऊ, असे राज्यातील जनतेला मी आश्वासन देऊ इच्छित आहे. मला अशा पद्धतीने मदत करायची आहे ज्यामुळे ते आनंदी होतील.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. हा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक असा होता. शिवाजी पार्कवर झालेल्या या भव्य सोहळ्याला देशभरातले राजकीय नेते एकत्र आलेच होते पण त्याचवेळी उद्योगक्षेत्रातले मान्यवर आणि बॉलिवूड कलाकारही अवतरले होते. व्यासपीठावर देशाच्या राजकारणातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी झालेली पाहायला मिळत होती. उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना व्यासपीठावर अगदी पहिली मानाची जागा देण्यात आली होती. त्यांच्या शेजारी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. जोशींच्या शेजारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या शेजारी ही सर्व समीकरणं जुळवून आणणारे, नव्या राजकीय नाट्याचे नेपथ्यकार शरद पवार विराजमान होते. 

शिवसेनेची या काळातली मुलुखमैदान तोफ अशी ख्याती मिळवलेले संजय राऊत, कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची एकत्र पोझ चर्चेचा विषय होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सोहळ्याला उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचं राजकीय वजन वाढल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून येते आहे. 

राजकीय सत्तापटलावर विरोधकांसोबतच अजित पवारांना समजावण्यातही सुळेंचा वाटा महत्त्वाचा राहिलाय. व्यासपीठावर डीएमकेचे स्टॅलिन असतील, काँग्रेसचे कमलनाथ असतील. सर्वांचं स्वागत करण्यात सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले छगन भुजबळ हे समीकरणही चर्चेचा विषय होतं. भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या उद्धव ठाकरेंची एन्ट्री एकदम ग्रँड होती. व्यासपीठावर नीता अंबानींनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नीता अंबानींनी आदित्य ठाकरेंशी अगत्याने साधलेला संवादही पाहण्यासारखाच होता. शिवाजीपार्कवर भव्य संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी अक्षरशः दंडवत घातला.

तामीळ अस्मितेचं राजकारण करणाऱ्या डीएमकेचे नेता एमके स्टॅलिन यांनी मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट लक्षणीय होती. राजकारणाव्यतिरिक्त ठाकरे परिवारासाठी काही हवळे क्षणही यावेळी अनुभवायला मिळाले. राज ठाकरेंच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या काकू आणि मावशी अशी दोन्ही नाती निभावणाऱ्या मंदाताई ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना प्रेमाने जवळ घेतलं. उद्धव ठाकरेंनीही मंदाताई ठाकरेंना पाया पडून नमस्कार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे या कुटुंबाची पोझ क्लिक ऑफ द डे ठरली. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेटही चर्चेचा विषय होती. 

युपीएच्या नेत्यांनी राज ठाकरेंचं प्रेमाने केलेलं स्वागत देशाच्या राजकारणात युपीएला नवा मित्र लाभल्याचं दाखवत होतं. अर्थात सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक मात्र हातात बाळासाहेबांचा फोटो आणि मनात त्यांची आठवण घेऊन या सोहळ्याचा साक्षीदार झाला होता.