अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतल्या मुलुंड इथं उघडकीस आली आहे.
मुलुंड इथल्या पाच रस्ता परिसरात असणाऱ्या पालिकेच्या प्रसूतिगृहात आठ महिन्यांच्या गरोदर महिलेना काल दुपारी दाखल करण्यात आलं होतं. निशा कसबे असं या महिलेचं नाव आहे. रात्री या महिलेची तब्येत अचानक बिघडली. पण यावेळी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर महिलेला तातडीने पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
प्रसूतिगृहात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत, आणि त्यामुळेच निशाचा मृत्यू झाला, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.