Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए (NDA) विरुद्ध विरोधकांची 'इंडिया' (INDIA) आघाडी अशी समोरासमोर टक्कर होणाराय. भाजपला (BJP) सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखण्यासाठी बंगळुरूमध्ये (Bangluru) गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. काँग्रेसप्रणित यूपीएचं (UPA) नामोनिशाण मिटलंय. त्यामुळं आता इंडिया अर्थात Indian National Democratic Inclusive Alliance च्या झेंड्याखाली विरोधकांची वज्रमूठ भक्कम होतेय.
बंगळुरुमध्ये 17-18 तारखेला विरोधकांची बैठक पार पडली. बैठकीच्या पहिल्या दिवशी अनौपचारिक चर्चा झाली. तर बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महागठबंधनाच्या नावावर चर्चा झाली. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांना आघाडीसाठी नाव सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. अखेर दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत INDIA नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला 26 पक्ष उपस्थित होते.
विरोधकांची वज्रमूठ... INDIA
काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, डीएमके, जेएमएम, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरएलडी, आईयूएमएल, केरळ काँग्रेस (एम), एमजीएमके, वीसीके, आरएसपी, केरळ काँग्रेस (जोसेफ), केएमडीके, अपना दल कमेरावादी, एमएमके, सीपीआईएमएल आणि एआईएफबी अशा 26 पक्षांचे नेते उपस्थित होते.
या बैठकीच्या निमित्तानं सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या. तर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचीही यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेसनं पंतप्रधानपदावरची दावेदारी सोडलीय. पंतप्रधानपद किंवा सत्तेसाठी ही आघाडी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय. तर आधी भाजपला सत्तेवरून दूर करूया, त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू, असं मत नीतीश कुमारांनी व्यक्त केलंय.
पंतप्रधानपदावर दावा नाही - काँग्रेस
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानात काँग्रेसला रस नसल्याचं म्हटलं आहे. या बैठकीत आमचं उद्दीष्ठ सत्ता मिळवणं हे नाहीए, संविधान, लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं रक्षण करण्यासाठी ही लढाई असल्याचं मल्लिकार्जु खर्गे यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
दरम्यान, विरोधी पक्षांची ही बैठक म्हणजे कट्टर भ्रष्टाचा-यांचं संमेलन असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. सत्ताधारी भाजपनंही मित्रपक्षांची मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपप्रणित एनडीएची बैठक राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत
भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोक जनता दल, आरपीआय (आठवले गट), प्रहार जनशक्ती पार्टी, जनसुराज्य शक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, अशा 38 पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
मात्र आधीचे एनडीएचे सदस्य असलेल्या चंद्राबाबूंची तेलगू देसम पार्टी आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
महाराष्ट्रात काय चित्र
महाराष्ट्रापुरता विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दुफळीचे परिणाम राष्ट्रीय राजकारणातही उमटलेत. राष्ट्रवादी शरद पवार गट इंडिया आघाडीमध्ये सामील झालाय. तर अजित पवार गट एनडीएमध्ये. शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीमध्ये आहे, तर शिवसेना शिंदे गट एनडीएमध्ये सहभागी झालाय.
अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे...