मुंबई : भाजपाच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांच्या माघारीवर, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीला खणखणीत टोला हाणला आहे. विधान परिषद निवडणुकीत रमेश कराड यांनी माघार घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे नेते रमेश कराड यांनी राष्ट्रवादीच्या विधानसभेची उमेदवारी सोडल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे, 'रमेश कराड यांच्या उमेदवारीची माघारी ही राष्ट्रवादीची हतबलता होती, आणि बीडचे राष्ट्रवादीत गेलेले नेतेच राष्ट्रवादी संपवतील'.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा दिला आहे, तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानंतर आमचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा, धनंजय मुंडे यांनी केला आहे.
विधान परिषद निवडणुकीत उस्मानाबाद-बीडमध्ये आज (सोमवार,७ मे) धक्कादायक घटना पाहायला मिळाली. कदाचीत राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीतील ही अपवाद अशी घटना असावी. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघी काही मिनिटं असताना अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता या निवडणूकीत राजकीय खळबळ उडालीय. रमेश कराड हे अगदी काही दिवसांपूर्वींच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत आले. त्यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं. पण आज कराड यांनी अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः धनंजय मुंडेंना मोठा झटका बसलाय.
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपला जोरदार धक्का दिला. पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि भाजप नेते रमेश कराड यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. कराड यांच्या प्रवेशाची फिल्डिंग लावून धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा ला मोठा धक्का दिला .कराड यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी ने भाजप समोर तगड आव्हान उभे केले . मात्र, कराड यांनी अर्जच मागे घेत उलट राष्ट्रवातीलाच धक्का दिला.
रमेश कराड हे 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झाले होते,गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपने उमेद्वारी दिली होती. मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले. कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ म्हणून परिचित आहेत. स्थानिक स्वराज्य संघातून त्यांनी भाजपला उमेदवारी मागितली होती मात्र भाजपने सुरेश धस याना पसंती दिल्याने कराड नाराज झाले. नाराज कराड याना गळाला लावत धनंजय मुंडे यांनी त्यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दिला. पण, 'अती घाई संकटात नेई' या म्हणी प्रमाणे कराडांनी मुंडेंना ऐनवेळी अडचणीत आणले.
उस्मानाबाद येथे धनंजय मुंडे,जीवनराव गोरे,राणा जगजितसिंह पाटील,अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत कराड यांचा प्रवेश आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा पार पडला होता.