सावधान! नव्या कोरोनाचा धोका, मुंबईत आढळले दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण

मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी, मुंबई मनपाने दिली नव्या व्हेरिएंटची माहिती

Updated: Apr 6, 2022, 06:08 PM IST
सावधान! नव्या कोरोनाचा धोका, मुंबईत आढळले दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण title=

मुंबई  :  कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर मुंबईत सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता एक चिंता वाढवणारी बातमी आहे. 

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळले आहेत. 'कापा' (Kappa variant) आणि 'एक्सई'  (XE Variant) अशी या कोरोनाच्या घातक व्हेरियंटची नावं आहेत. मुंबई महापालिकेनं केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) चाचणीत हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले  आहेत. एकीकडं कोरोना कमी झाल्यानं सरकारनं निर्बंध उठवलेत. अगदी मास्क सक्ती देखील ऐच्छिक करण्यात आलीय. तर दुसरीकडं कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट आढळल्यानं मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

मुंबई महापालिकेने अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले. यात 230 रुग्णांमधली कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. 230 पैकी 228 रुग्ण आढळले तर उरलेल्या दोन बाधितांपैकी एक रुग्ण कापा आणि दुसरा रुग्ण एक्सई व्हेरियंटने बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अकराव्या चाचणीत कोविड बाधा झालेल्या एकूण 376  रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 230 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. 

कोणत्या वयोगटातील रुग्ण
-  0 ते 20 वर्षे वयोगट - 31 रुग्ण (13 टक्के)
-  21 ते 40 वर्षे वयोगट – 95 रुग्ण (41 टक्के)
- 41ते 60 वर्षे वयोगट - 72 रूग्ण (31 टक्के)
- 61 ते 80 वयोगट - 29 रुग्ण (13 टक्के)
- 81 ते 100 वयोगट - 3 रुग्ण (1 टक्के)

230 पैकी 21 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. तरदोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ९ जण रुग्णालयात दाखल आहेत.