मुंबई : हिवाळा सुरु झाला की भारतात परदेशी पाहुण्यांचे आगमन होतं.
खासकरून इथले समुद्र किनारे, पानवठे या परदेशी पाहुण्यांनी गजबजून जातात.. असेच काही परदेशी पाहूणे सध्या समुद्र किना-यावर आलेत.. युरोपातून आलेल्या या पाहुण्यांना पहाण्याची पक्षीप्रेमींची पावलं समुद्र किनारी वळू लागलीत..
पांढरा शुभ्र रंग... पंखांवर राखी रंगाची शेड... गुलाबी रंगाचे पाय आणि गुलाबी रंगाची चुटुकदर चोच... या चोचीवर एक काळ टीपका... अशा या धवल पक्षांनी सध्या नवी मुंबईच्या समुद्र किना-यावर डेरा टाकलाय.. हिवाळा सुरु झाला की युरोपातले हे गोरे पाहुणे दरवर्षी मुंबई, नवी मुंबई आणि अलिबागच्या खाडी किनारी दिसु लागतात.
युरोपातली कडाक्याची थंडी त्यांना मानवत नाही. त्यामुळे हे सिगल उष्ण कटीबंधाकडे आपला मोर्चा वळवतात. थंडीचा जोर कमी झाला की पुन्हा मायदेशी परततात. दरवर्षी येणाऱ्या या पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षी पक्षी प्रेमी आवर्जून इथं येतात. या पक्षांना खाऊ घालतात.. यामुळे हे पक्षी न घाबरता माणसाच्या भोवती सहज वावरताना दिसतात.
त्यांचे खरे खाद्य म्हणजे पाणथळ भागातले किडे, छोटे मासे, कीटक हे आहे.. पण त्यांना ब्रेड, फरसाण, बिस्कीट असे पदार्थ खाऊ घातल्यानं त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केलीये. तेव्हा मित्रांनो या परदेशी पाहुण्यांना पहाण्यासाठी नक्की या.. पण आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही, त्यांचा पर्यावास बिघडणार नाही याची काळजी घ्या..