Salman Khan House Firing: बॉलिवुडचा भाईजान म्हणजे सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी गोळीबाराची घटना घडली. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलमानच्या घराच्या दिशेने चार गोळ्या चालवल्या. या घटनेची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब या पाच राज्यांच्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र आता या प्रकरणात सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी महिन्याभरापासून योजना आखली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईनंतर आता कुख्यात गुन्हेगार रोहित गोदाराचे नावही समोर आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांनी त्यांची बाईक वांद्रे परिसरातच सोडली. दोघेही हरियाणा किंवा राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटोही समोर आले. यामधील एक व्यक्ती विशाल उर्फ कालू असल्याची माहिती पुढे आली आहे ज्याने हरियानामध्ये दोन महिन्यांपूर्वी एकाची हत्या केली होती. त्यामुळेच विशालनेच सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशी झाली सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याची प्लॅनिंग
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबाराची योजना अमेरिकेत तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्यांना व्हर्च्युअल नंबरवरून कामाची माहिती देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर अमेरिकेतल्या रोहित गोदाराच्या सांगण्यावरून हल्लेखोरांसाठी शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी योजना आखली जात होती. यासाठी हल्लेखारोंना निवडण्याचे काम अनमोल बिश्नोईने रोहित गोदाराला दिलं होतं. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोहित गोदाराचे अनेक राज्यांमध्ये डझनभर प्रोफेशनल शुटर्स आहेत. सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सर्वात मजबूत नेटवर्क कोणाचे असेल तर ते अमेरिकेत बसलेला रोहित गोदराचे आहे. रोहित गोदाराने अलीकडेच राजस्थानमधील हायप्रोफाईल राजू थेठ हत्याकांड घडले होते. त्यानंतर सुखदेव सिंगने गोगामेडी हत्याकांड घडवून आणले होते आणि दोन्ही हायप्रोफाईल हत्याकांडांमध्ये हल्लेखोरांचा बंदोबस्त रोहित गोदाराने केला होता.
लॉरेन्स बिश्नोई गॅंग ही आपल्या टोळीसाठी नेहमी शस्त्रांची एक खेप तयार ठेवते. अनेक राज्यांमध्ये हल्लेखोरांना त्यांच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार ठराविक ठिकाणी शस्त्रे मिळतात. तपास यंत्रणांना पूर्ण संशय आहे की रोहित गोदाराने त्याच्या इतर साथीदारांकडून दोन्ही शूटर्सना शस्त्रे पुरवली आणि त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. बिष्णोई गँगचा इतिहास सांगतो की या टोळीसाठी काम करणाऱ्या हल्लेखोरांना लॉरेन्स गँगने कधीच कामावर घेतले नाही. उलट हे हल्लेखोर स्वत: टोळीत सामील होऊन मोठे काम करण्यास सदैव तयार असतात.
रोहित गोदाराने विशालची निवड का केली?
रोहतकमधील एका ढाब्यावर सचिन या सट्टेबाज आणि घोटाळेबाजाची नुकतीच हत्या झाली होती. ज्यामध्ये रोहित गोदाराच्या सांगण्यावरून विशाल उर्फ कालू आणि इतर हल्लेखोरांनी सचिनची निर्घृण हत्या केली होती. या घटनेचे अतिशय धक्कादायक फुटेज देखील समोर आलं होतं. त्यामुळे सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी रोहित गोदाराने विशालची निवड केली असावी.