नातू हवा म्हणून सूनेचा छळ? विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा

विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती.

Updated: Mar 3, 2020, 07:25 AM IST
नातू हवा म्हणून सूनेचा छळ? विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा तक्रारदार पिडितेचा पती अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्याची पत्नी शीतल अशा एकूण पाच जणांविरुद्ध मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडित सूनेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिचा छळ करण्यात येत होता. पीडितेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

पहिल्या मुलीनंतर पुन्हा दुसरी मुलगीच झाली. पण मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावले. या प्रकारानंतर चव्हाण कुटुंबाकडून आपला अधिकच छळ होऊ लागल्याचा आरोप पिडीत सूनेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मात्र, विद्या चव्हाण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.