मुंबईतील 'बत्तीगूल' मागे हे आहे कारण, पाहा कुठे आणि का झाला हा बिघाड?

दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली.

Updated: Feb 28, 2022, 01:05 AM IST
मुंबईतील 'बत्तीगूल' मागे हे आहे कारण, पाहा कुठे आणि का झाला हा बिघाड? title=

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे रविवारी (दि.२७) दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

ट्रॉम्बे येथील मुख्य ग्रहण केंद्रामधून दक्षिण मुंबईत वीजपुरवठा करण्यात येतो. कळवा–ट्रॉम्बे, मुलुंड–ट्रॉम्बे, सोनखर–ट्रॉम्बे, चेंबूर–ट्रॉम्बे, सॉल्सेट–ट्रॉम्बे १, सॉल्सेट–ट्रॉम्बे २, चेंबूर–ट्रॉम्बे १ आणि चेंबूर–ट्रॉम्बे २ या वाहिन्यांच्या माध्यमातून दक्षिण मुंबईत वीज पुरविण्यात येते.

मुंबई व उपनगरात मेट्रो-२ प्रकल्पाची कामे सुरू आहेत. एमएमआरडीए मेट्रो-२ बी या प्रकल्पाच्या कामासाठी २२० के.व्ही. क्षमतेच्या सोनखर - ट्रॉम्बे आणि चेंबूर–ट्रॉम्बे या वाहिन्या चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीपासून बंद करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मेट्रो-४ या प्रकल्पासाठी २२० के.व्ही. क्षमतेची सॉल्सेट – ट्रॉम्बे १ ही वीजवाहिनी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११पासून बंद करण्यात आली होती.

या बदलांमुळे भार नियंत्रणासाठी नेरूळ–चेंबूर आणि सोनखर–ट्रॉम्बे या वीज वाहिन्या एकत्र जोडल्या होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठी रविवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी सात वाजता नियोजित कामासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.

सकाळी आठ वाजून ४४ मिनिटांनी मुलुंड–ट्रॉम्बे ही वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे भार नियंत्रण करण्यासाठी राज्य भार प्रेषण केंद्राने टाटा औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि टाटा जलविद्युत निर्मिती या केंद्रांना सकाळी साडेनऊ वाजता क्षमता वाढविण्यासाठी निर्देश दिले. मात्र, वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी टाटा वीजनिर्मिती केंद्राकडून मेलची मागणी करण्यात आली.

टाटा पॉवरनी वीजनिर्मिती लगेच वाढविली असती तर हा प्रसंग टाळता आला असता. त्याचवेळी सकाळी नऊ वाजून ४९ मिनिटांनी भाभा अणु संशोधन केंद्राच्या परिसरातील जंगलात आग लागली. त्यामुळे २२० के.व्ही. क्षमतेची कळवा–ट्रॉम्बे ही वीजवाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्याचा परिणाम ट्रॉम्बे–सॉल्सेट वाहिनीवर झाला.

भार वाढल्यामुळे ही वीजवाहिनीही बंद पडली. त्यामुळे ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रावर अतिरिक्त भार आला. परिणामी, वीजनिर्मिती संच बंद पडले. या तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण मुंबई (कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर) परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वीजपुरवठा पूर्ववत झाला.

२२० केव्ही क्षमतेची ट्रॉम्बे– सॉल्सेट वीजवाहिनी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी दुरुस्त केली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा कार्नाक, बॅक बे, परळ आणि महालक्ष्मी येथील वीजपुरवठा सकाळी दहा वाजून १३ मिनिटे ते साडेदहा या वेळेत पूर्ववत करण्यात आला. संपूर्ण वीजपुरवठा ११ वाजून १० मिनिटांपर्यंत पूर्ववत करण्यात आला. ट्रॉम्बे येथील विद्युत संच–७ हा सकाळी दहा वाजून ५६ मिनिटांनी पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ५०० मेगावॅट क्षमतेचा विद्युत संच– ५ दुपारी एक वाजून चार वाजता पूर्ववत केला. त्यानंतर २५० मेगावॅट क्षमतेचा विद्युत संच– ८ हा दुपारी चालू करण्यात आला.

महापारेषणच्या नेरूळ–चेंबूर, कळवा–ट्रॉम्बे, सोनखर–ट्रॉम्बे या वीजवाहिन्या अनुक्रमे दहा वाजून १६ मिनिटे, दहा वाजून २३ मिनिटे आणि ११ वाजून ४९ मिनिटांनी पूर्ववत करण्यात आल्या.

भाभा अणु संशोधन केंद्र परिसरातील मुलुंड – ट्रॉम्बे या वाहिनीच्या दुरुस्तीचेही काम वेगाने सुरू आहे.

वीजपुरवठ्यातील खंड आणि दुरुस्ती... -

मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे २२० केव्ही क्षमतेच्या सोनखर–ट्रॉम्बे, चेंबूर–ट्रॉम्बे या वाहिन्या चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीपासून बंद -

मेट्रो-४ प्रकल्पासाठी २२० के.व्ही. क्षमतेची सॉल्सेट–ट्रॉम्बे १ ही वाहिनी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ पासून बंद -

भार नियंत्रणासाठी एकत्र जोडलेल्या नेरूळ–

चेंबूर आणि सोनखर–ट्रॉम्बे या वीजवाहिन्या वेगळ्या करण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता वीज बंद केली. त्यावेळी सकाळी आठ वाजून ४४ मिनिटांनी मुलुंड–

ट्रॉम्बे ही वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद. - भाभा अणु संशोधन केंद्राच्या परिसरातील वीज वाहिनीतही जंगलातील आगीमुळे तांत्रिक बिघाड -

ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रावर अतिरिक्त भार आला. परिणामी वीज निर्मिती संच बंद पडले -

ट्रॉम्बे–सॉल्सेट वीजवाहिनी दुरुस्त केल्यानंतर दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा कार्नाक, बॅक बे, परळ आणि महालक्ष्मी येथील संपूर्ण वीजपुरवठा ११ वाजून १० मिनिटांपर्यंत पूर्ववत -

बंद पडलेले वीजनिर्मिती संचांची वेगाने दुरुस्ती केल्यामुळे वीजपुरवठा लवकर पूर्ववत -महापारेषणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे दुरूस्तीचे काम ५० ते ५५ मिनिटांत वेगात पूर्ण