उद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा?

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.

Updated: Nov 21, 2019, 07:34 PM IST
उद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा? title=

मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. उद्याच महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. उद्या पवार आणि उद्धव ठाकरे भेट होऊ शकते. त्याआधी सकाळी १० च्या सुमाराला शिवसेनेची बैठक होणार आहे, त्यानंतर दुपारी आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकासआघाडीचे नेते सत्तास्थापनेचा दावा करायला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदावर दावा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर उद्याच तिन्ही पक्षांकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस असल्यामुळे या दिवस शपथविधी व्हावा, यासाठी काँग्रेस आग्रही आहे. 

राज्यामध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका अखेर संपल्या आहेत. सगळ्या मुद्द्यांवर आमचं एकमत झालं असल्याचं वक्तव्य या बैठकांनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. दिल्लीतल्या बैठका संपल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईला रवाना होणार आहेत.

मुंबईमध्ये आल्यानंतर निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या घटकपक्षांसोबत चर्चा करु. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम आणि खातेवाटपाबाबत माहिती दिली जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.