मुंबई : मुंबईची (Mumbai) लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) आता आपलं जुने रुप बदलत चाललीय. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता लोकल आता अपुरी पडू लागलीय. त्यामुळे रोज धावणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो रेल्वे (Mumbai Metro), एसी बेस्ट बस (AC BEST Bus) असे पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लोकलमधूनही (Local) वातानुकूलित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एसी लोकल (AC local) प्रवाशांसाठी आणल्या आहेत. लोकलच्या वेळात या एसी लोकल सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलला स्थान देण्यात आलं आहे. (railway police struggle to close doors ac local video viral)
मात्र तरीही आता एसी लोकलचीही क्षमता संपल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एसी लोकल तुडूंब भरल्याचे पाहायला मिळत आहे. एसी लोकलचे दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय ती सुरु होत नाही. त्यामुळे एसी लोकल पुढे पाठवण्यासाठी रेल्वे पोलिसांना मदतीसाठी उतरावं लागलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबईतील एक एसी लोकल ट्रेन पूर्णपणे प्रवाशांनी भरलेली दिसत आहे. पोलीस कर्मचारी दरवाजा बंद करण्यासाठी धावत येताना दिसतात आणि प्रवाशांना अक्षरक्षः खेचून बाहेर काढतात. त्यानंतर पोलिसांनी लोकलमधील प्रवाशांना आत ढकलून दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न करतात. पोलीस कर्मचारी एका दरवाज्याकडून दुसऱ्या दरवाजाकडे पळत असतात. पोलिसांच्या प्रयत्नांनंतरही प्रवासी दरवाजातच उभे आहेत. तसेच प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी दयनीय परिस्थिती पाहून हसताना दिसतात.
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एसी लोकल ट्रेन्सच्या प्रवासी संख्येने 27 ऑक्टोबरपर्यंत या आर्थिक वर्षात 1 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (पीआरडी) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात पश्चिम रेल्वेने सांगितले की गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर एकूण 79 एसी लोकल धावत आहेत.